पूरस्थिती ओसरल्यानंतरची रोगराई थांबविण्यासाठी वेळीच उपाययोजना करा – राजेश क्षीरसागर

 

२०१९ च्या महापुराचा अनुभव लक्षात घेता पूरस्थिती ओसरल्यानंतर रोगराई वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनासमोर असणाऱ्या मर्यादा पाहता गतवेळ प्रमाणे ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून साफसफाई साठी आवश्यक मशिनरीची मागणी करण्यात आली आहे. यासह आरोग्याच्या बाबतीत ठाणे डॉक्टर्स असोसिएशनचे पथक देखील दाखल होणार आहे. यांच्या मदतीने रोगराई उधभवू नये याची दक्षता घेवून वेळीच उपाययोजना करावी अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिल्या.

शहरातील पाणीपुरवठा अखंडीत ठेवण्यासाठी पंपिंग स्टेशनची उंची वाढविण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा, महावितरण कंपनीस सब स्टेशन निर्मितीसाठी मागणी केल्याप्रमाणे जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राजेश क्षीरसागर यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.

शहरात पूरस्थिती ओसरल्यानंतर शहरात रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूरबाधित क्षेत्राची स्वच्छता करून, औषध फवारणी करण्यात यावी. ठाणे येथून डॉक्टरांचे पथक दाखल होत असून त्यांच्या मदतीने पूरबाधित क्षेत्रासह सर्वच शहरात ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे घेवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. शहरात पाणीपुरवठा करणारे पंपिंग स्टेशन बंद झाल्याने शहरात पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे.

यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शहरास पाणीपुरवठा करणारे बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर या प्रमुख पंपिंग स्टेशनची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. त्यास शासनाकडून निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करू. महावितरणच्यावतीने नवीन सब स्टेशनची निर्मिती करून शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडे जागा मागणी केली आहे. त्याप्रमाणे सब स्टेशन निर्मितीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. महापुराच्या काळात शहरातील कोव्हीड रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये, अशा सूचना केल्या.

प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी माहिती देताना, शहरातील साफसफाई साठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छतेसाठी दोन वाहने दाखल झाली आहेत. लवकरच पुराचे पाणी ओसरल्यानंतर या वाहनांच्या मदतीने साफसफाई करून, औषध फवारणी करण्यात येणार आहे. पूरबाधित क्षेत्रातील स्थलांतरीत नागरिकांसाठी ४० ठिकाणी निवारण केंद्र उभी करण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: