विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करा : अजित पवार

ग्लोबल न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. परंतू, गत काही दिवसात जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढलेली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्यपूर्ण स्वच्छता, मास्कचा वापर व सुरक्षित अंतर व शासनाच्या निमयमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे तसेच निष्कारण गर्दी करणा-यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे. कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.

‘कोविड-19’ विषाणू उपाययोजनाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विधान परिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. निलम गोऱ्हे व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठकीत सहभागी झाल्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री दिलीप मोहिते, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरात उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना निश्चितच दिलासा मिळेल.

कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना करताना ग्रामीण भागात समन्वयासाठी स्वतंत्रपणे अधिका-यांची नेमणूक करावी, कोरोना प्रतिबंध उपाययोजना व इतरही योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. सर्वांशी समन्वय ठेवून कार्यवाही होणे अपेक्षित आहे जेणेकरून उपाययोजनेची परिणामकारता वाढेल,असे त्यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: