स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटना CCTV त कैद

 

ठाणे | धावत्या ट्रेनमधून चालू नका तसेच उतरू नका, धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करु नका तसेच रेल्वे ट्रॅक ओलांडण्याऐवजी पादचारी पुलाचा वापर करा अशा सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येतात. मात्र, असे असले तरी अनेक नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात.

लोकल पकडण्याच्या नादात रेल्वे रूळ ओलांडणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पाहायला मिळाला. जर पोलीस कर्मचाऱ्याने वेळेवर हात दिला नसता तर युवकाचा जीव क्षणार्धात गेला असता. या सर्व प्रकाराच सीसीटीव्ही फुटेज अंगावर काटा आणणारे आहे.

गुरुवारी सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील लोकल पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून रूळ ओलांडून जाण्याचा एका प्रवाशाने प्रयत्न केला. मात्र, या नादात येणाऱ्या रेल्वेचा स्पीड न समजल्याने आणि रेल्वे येताना दिसल्यावर स्तब्ध झालेल्या युवकाला पोलीस शिपाई तुषार सोनताटे याने हात दिला आणि त्याला फलाटावर ओढले. त्यामुळे त्याचा जीव बचावला आहे.

हा प्रकार घडत असताना त्या लोकल चा धक्का आपल्यालाही लागू शकतो याचा विचारही तुषार यांनी केला नाही आणि त्या युवकाचे प्राण वाचले. या प्रकाराचे सीसीटीव्ही दृश्य पाहिल्यानंतर तुषार यांच्या वरिष्ठांनी त्याचे कौतुक तर केले आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना देखील तुषार यांचे कौतुक केले आहे.

Team Global News Marathi: