सुषमाताई घसा कोरडा करत फिरतात, इकडे शिवसेना पैसे घेऊन मोकळी

 

एकिकडे शिंदे सरकारवर आरोप करत सुषमाताई अंधारे घसा कोरडा करतात. तर दुसरीकडे शिवसेना सरकारकडून पैसे घेऊन ‘सामना’तून जाहिरात प्रकाशित करतात. शिवसेनेचा देव पैशात आहे, हे आता कळलंय, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.

आदित्य ठाकरे सांगत फिरतात हे खोके सरकार आहे. म्हणजे तुम्हाला पैसे पाहिजेत, पण सरकार नको? ही कुठली दुटप्पी भूमिका? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारतर्फे राज्यातील 75 हजार तरुणांना रोजगार देण्यासंबंधीची जाहिरात आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक ‘सामना’मधील जाहिरात सध्या राजकीय वर्तुळात चर्चेची विषय ठरली आहे. दैनिक सामनाच्या मुख्य पानावर माहिती व जनसंपर्क विभागाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह एका कार्यक्रमाचे निमंत्रण छापण्यात आलेले आहे.

सदर जाहिरातीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचेही नाव नमूद करण्यात आले आहे. भारतीयस्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या अंतर्गत 75 हजार रोजगार देण्याचा मानस सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे. यासाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. आज अकरा वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे याबाबतच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Team Global News Marathi: