मुंबई : पंढरपू-मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीसाठी अवघे मतदानाला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. या मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भरत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भगीरथ भरत भालके हे राष्ट्रवादीतर्फे तर भाजपा कडून समाधान अवताडे निवडणूक लढवत आहेत.
त्यात आज निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या ब्रिच कँडी रुग्णालयातून VC च्या माध्यमातून पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघात सभेसाठी हजर झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे सध्या मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.
त्यात खासदार सुळे रुग्णालयातून दुहेरी भूमिका निभावताना दिसत आहे. सुप्रिया सुळे या एक मुलगी म्हणून रुग्णालयात आपल्या वडिलांची सर्वतोपरी काळजी घेत आहेत. तर दुसऱ्या बाजुला नेत्या म्हणून रुग्णालयातूनच आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी सभाही घेत असल्याचे चित्र आज दिसले. ज्याप्रकारे शरद पवार हे प्रचारामध्ये स्वतःला झोकून देतात त्याच प्रमाणे खा. सुप्रिया सुळे सुद्धा आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहे.