राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाटयानंतर एक महत्त्वाचं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना विरुद्ध शिंदेसेना यासंदर्भातील विविध याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असतानाच शिवसेना कुणाची या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोर्टातल्या याचिकांवरील सुनावणी आधी घेण्यात यावी, अशी याचिका उद्धव ठाकरे गटातर्फे आज सुप्रीम कोर्टासमोर मेंशन करण्यात आली.
मात्र हा खटला घटनापीठासमोर चालवायचा की नाही, यासंदर्भातीलच निकाल होणे बाकी आहे, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आज केलेल्या मागणीवरही समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचं सध्या तरी दिसून येतंय. एकूणच केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आधी होणार असल्याने शिवसेना पक्ष हातातून निसटतो की काय, अशी भीती मूळ शिवसेनेच्या गोटात व्यक्त केली जातेय.
एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंबंधीसहित इतर काही याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. या याचिकांवरील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षावर दावा सांगितला आहे. उद्धव ठाकरे तसेच शिंदेसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंबंधीचे पुरावेही दाखल करण्यात आले आहेत.
तसेच शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर कुणाचा हक्क आहे, यासंदर्भातील निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत येत्या 19 ऑगस्ट रोजी घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेच्या नेतृत्वाला झुगारून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटासंबंधीच्या याचिकांवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी झाल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.