सर्वोच्च न्यायालयाचा वापर करून महाविकास आघाडीवर दबाव आणण्याचा केंद्राचा प्रयत्न – राऊत

दिल्ली :  राज्यात सुरु असलेल्या गोंधळावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधक आणि केंद्र सरकार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. परमबीर सिंग हे सर्वोच्च न्यायालयाच्या यंत्रणेचा वापर करुन राज्य सरकारवर दबाव आणू पाहत आहेत. तशी वेळ आली तर महाराष्ट्र सरकाराने विचार करायला हवा, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.

तसेच देशाचे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळत नाही, दबाव आणला जातो, असे त्यांनी म्हटले होते. मग परमबीर सिंह हेदेखील न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारवर असाच दबाव आणू पाहत आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला होता.

आज राऊत दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बचा मुद्दा भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावर उचलण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन भाजपच्या आरोपांचे खंडन करत सडेतोड उत्तर दिले आहे.

परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन लोकसभा आणि राज्यसभेत भाजपच्या खासदारांनी जोरदार अदळा-आपट केली. मात्र, नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना आयपीएस अधिकारी संजीव भट आणि अधिकारी शर्मा यांनी तत्कालीन सरकारवर अशाच गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यांची ही पत्र आम्ही समोर आणली तर भाजपचे नेते असाच थयथयाट करायला तयार आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

Team Global News Marathi: