मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर शनिवारी एक छोटीशी शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेल्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात एमआरआय चाचणी केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार शनिवारी लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रीया पार पडली. मात्र आता त्यांच्या प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होते. मात्र या बैठकीला ते उपस्थित राहिले नव्हते त्यामुळे आज ते लॉकडाऊन संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. मनसेने लॉकडाऊनला याआधीच आपला विरोध दर्शवला आहे.