जोरदार शक्तीप्रदर्शन करत सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

कोल्हार | भाजपच्या विजयाच्या घोषणा, कार्यकर्त्यांची गर्दी अशा वातावरणात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजित शिवाजीराव कदम यांनी बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत जिल्हाधीकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे पदयात्रा काढली. भाजप नेत्यांची उपस्थिती, कार्यकर्त्यांची गर्दी, घोषणाबाजी करत वातावरण निर्मिती केली. विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कदम यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. उमेदवारी अर्ज करण्याचे काम सुरू झाले असून, आज काँग्रेस तसेच भाजपच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.

आज भाजपचे कार्यकर्ते सकाळी ९ वाजल्यापासून दसरा चौकात एकत्र येण्यास सुरुवात झाली. दहा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक परिसर कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलला. राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयास अभिवादन करुन रॅलीस सुरुवात झाली. भाजपचे झेंडे, विजयाच्या घोषणा, कमळाच्या चिन्हाच्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते यामुळे वातावरण निर्मिती झाली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, प्रा.जयंत पाटील, माजी महापौर सुनील कदम, सुहास लटोरे यांची प्रमुख उपस्थिती उमेदवारी अर्ज दाखल केला.

Team Global News Marathi: