ठाणे जिल्ह्यातील ‘या’ १६ भागांमध्ये आजपासून 21 दिवसांचा कडक लॉकडाउन

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनोचा उद्रेक वाढला आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यातील अनुभव पुन्हा एकदा येतोय की काय? अशी धास्ती सामान्यांमध्ये आहे. मुंबईतील ठाणे (Thane 16 Hotspot) शहरात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर करत आहे. कोरोनाचा प्रसार शहरातील काही भागात झपाट्याने वाढत आहे. ( Lockdown declared in 16 hotspots in Thane city)

रूग्णाचे बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के तरीही …

ठाण्यात कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असले तरी रूग्णसंख्या वाढतीच राहीली आहे. त्यामुळे शहरातील हॉटस्पॉटची संख्या पुन्हा १६ झाली आहे. तेव्हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या १६ हॉटस्पॉटमध्ये ३१ मार्चपर्यत लॉकडाऊन कायम असल्याचे महापालिकेने काढलेल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने सरकारने टप्यापटप्याने लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरूवात केली होती. मात्र, कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, मुंबई-पुण्यासह मराठावाडा आणि विदर्भातील अनेक शहरांमध्ये कोरोना संक्रमण वाढलं आहे. त्यामुळे दररोज राज्यातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

ठाण्यातील ‘या’ भागात कडक लाॉकडाऊन

ठाणे महापालिका हद्दीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनानं उद्रेक झालेल्या भागांना हॉटस्पॉट घोषित केलं आहे. या हॉटस्पॉटमधील करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १६ हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये आजपासून (९ मार्च) लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांनी तसे आदेश काढले असून, हा लॉकडाउन सुरूवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाउनप्रमाणेच कडक असणार आहे.

१) आई नगर, कळवा
२) सूर्या नगर, विटावा
३) खरेगाव हेल्थ सेंटर
४) चेंदणी कोळीवाडा
५) श्रीनगर
६) हिरानंदानी इस्टेट
७) लोढा माजीवाडा
८) रुणवाल गार्डन सिटी, बालकुम
९) लोढा अमारा
१०) शिवाजी नगर
११) दोस्ती विहार
१२) हिरानंदानी मिडोज
१३) पाटील वाडी
१४) रुणवाल प्लाझा, कोरेस नक्षत्र, कोरेस टॉवर
१५) रुणवाल नगर, कोलबाद
१६) रुस्तोमजी, वृंदावन

यामध्ये परिमंडळ एकमधील कळवा प्रभाग समिती क्षेत्रात विटावा,आईनगर,सुर्यनगर,खारेगाव परिसर हे हॉटस्पॉट आहे.तर,परीमंडळ दोनमध्ये चेंदणी कोळीवाडा,वागळे व श्रीनगर परिसर हॉटस्पॉट आहेत. परिमंडळ ३ मध्ये सर्वाधिक हॉटस्पॉट असून यात माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील,बाळकुम,लोढा व लोढा आमारा, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोज गृहसंकुले आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात दोस्ती विहार,शिवाई नगर,कोरस टॉवर, कोलबाड, रुस्तुमजी ‘ वृदांवन येथे लॉकडाऊन ३१ मार्च.पर्यत ठेवण्यात आला आहे. हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणी राज्य शासनाच्या नियमांतर्गत सर्व व्यवहार सुरळीत राहतील असेही अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

देशात गेल्या २४ तासांत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांपैकी ८६ टक्के रुग्ण महाराष्ट्रासह सहा राज्यांत आहेत. त्यात केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. सोमवारी कोरोनाचे १८ हजारांहून अधिक रुग्ण आढळले, ९७ जणांचा बळी गेला. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी १२ लाखांवर पोहोचली आहे. महाराष्ट्रामध्ये दर आठवड्याला वाढणारे नव्या रुग्णांचे प्रमाण ११.१३ टक्के असून ते राष्ट्रीय स्तरावरील २.२२९ टक्के इतक्या सरासरीपेक्षा अधिक आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: