राज्यात लसीकरणाचा वेग वाढवा, केंद्राच्या सर्व राज्यांना सूचना

सध्या पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे लसीकरणाला सुरवात झालेली असताना दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली वाढ राज्य तसेच केंद्र सरकारच्या चिंतेत अधिक भर घालत आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह काही राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. तसेच अद्याप अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यातच आलेली नाही यावर सुद्धा राज्याचे लक्ष वेधले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पाठवलेल्या पात्रात म्हटले आहे की, आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवले पाहिजेत, किमान चार दिवस तरी लसीकरणाचे काम झाले पाहिजे तसेच त्यापुढील टप्प्यात ५० वर्ष पुढील व्यक्तींचे लसीकरणही हाती घेण्याची गरज आहे. काही राज्यांनी आठवड्यातून दोन दिवस लसीकरण सुरू ठेवले असून काही राज्यांत चार दिवस लसीकरणाचे काम केले जात आहे.

तसेच येत्या काही दिवसांत वेगाने लसीकरण केले जाईल अशी अपेक्षा आहे. उपविभागीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, आरोग्य उपकेंद्रे यांनी १ मार्चपासून लसीकरणाची आणखी व्यापक व्यवस्था करण्याची गरज आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात यावेत.

Team Global News Marathi: