राज्यात राष्ट्र्पती राजवट लागू करण्याची मंत्री रामदास आठवले यांची राष्ट्रपतींकडे मागणी

नवी दिल्ली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपतींना भेटून ही मागणी केली आहे.
महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था; कोरोना संसर्गाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, राज्य सरकारवरून जनतेचा उडालेला विश्वास पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन दिले.

कोरोनाच्या महामारीचा महाराष्ट्रात वेगाने फैलाव होत आहे. तीन पक्षांचे राज्य सरकार निर्णय घेण्यात कमालीचे उदासीन असून राज्याचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. नाकर्तेपणा असलेल्या राज्य सरकारमुळे जनतेत निराशेचे वातावरण आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

निसर्ग वादळ, कोरोना संकट सर्व आघाड्यांवर निष्क्रिय राहिलेले महाविकास आघाडी चे राज्य सरकार आहे. महाराष्ट्राचे राज्य सरकार त्वरीत बरखास्त करून येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून त्याबाबतचे निवेदन आज राष्ट्रपतींना रामदास आठवले यांनी दिले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत विचार करू, असे आश्वासन राष्ट्रपतींनी दिले असल्याचे रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

Team Global News Marathi: