पिपरी चिंचवड : कोरोनामुळे निधन झालेल्या मनपा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाख रुपये

कोरोनाच्या संकटात आपली सेवा बजावताना कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांच्या वारसास प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. १३ कर्मचा-यांच्या वारसास सुरक्षा कवच योजनेनुसार २५ लाख रुपये अदा करण्यात येणार आहे. यासाठी ३ कोटी २५ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने काल मान्यता दिलेली आहे.

कोरोना उपाय योजनेसाठी ड्युटीवर असलेल्या महापालिका अधिकारी, कर्मचारी, महापालिकेकरीता सेवा देणारे कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, मानधनावरील नियुक्त केलेले कामगार यांचे कोरोनामुळे निधन झाल्यास त्यांच्या वारसांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय ९ जुलै २०२० रोजी घेण्यात आला.

संबंधित मृत व्यक्तीच्या वारसाने अनुकंपा नियुक्तीचा विकल्प न स्वीकारल्यास त्यांना महापालिकेतर्फे अतिरिक्त २५ लाख रुपये देण्यात येणार आहे. महापालिकेकडून दिल्या जाणा-या अर्थसहाय्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. याबाबतच्या धोरणाला महासभेने २६ ऑगस्ट २०२० रोजी मान्यता दिली आहे.

त्यानुसार कामगार कल्याण विभागाकडे संबंधित विभागप्रमुखांच्या शिफारशीसह प्राप्त झालेली १३ प्रकरणे सर्व कागदपत्रांसह समितीपुढे सादर केली होती. कागदपत्रांची तपासणी करुन सर्व संबंधित कर्मचा-यांच्या वारसास मंजूर धोरणानुसार कोरोना विषाणू-सुरक्षा कवच योजनेनुसार महापालिकेकडून प्रत्येकी २५ लाख रुपये अदा करण्यास १९ मार्च २०२१ रोजीच्या समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

Team Global News Marathi: