एसटी संपकऱ्यांच्या विरोधात आता नागरिकांचे आंदोलन !

 

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील गोरगरीब कष्टकरी जनता व विद्यार्थी यांची प्रचंड आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे संपकर्त्यांनी तूर्त संप स्थगित करुन एसटी बसेस सुरु कराव्यात व सरकारनेही सर्व मागण्यांचा सहानुभूतीने विचार करावा, या मागणीसाठी १० मार्च रोजी विधीमंडळासमोर एसटी वाचवा-एसटी वाढवा कृती समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत.

एसटीच्या संपामुळे मुख्यतः राज्यांतील मुलींच्या शिक्षणावर गदा आली आहे. ग्रामीण भागांतील मुलींचे शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी १० मार्च रोजी, धरणे आंदोलन केले जात आहे. एसटी कामगारांना त्यांचे प्रश्न मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.

मात्र, एसटी ही राज्यांतील जनतेची जीवन वाहिनी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण वाहिनी आहे. याचा विसर कामगार व सरकार दोघांनाही पडता कामा नये, असेही पत्रकात नमूद केले आहे. एसटी संपकऱ्यांनी काही मूठभर राजकारण्यांचे दुष्ट हेतुला बळी पडू नये.

तसेच एसटी कामगारांचे प्रश्न लोकांच्या पाठिंब्याशिवाय सुटू शकणार नाहीत आणि आजतरी या संपास लोकांची सहानुभूती राहिलेली नाही, हे संबंधितांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. १३ महीने ताकदीने चालविलेले शेतकरी आंदोलनही काही मागण्या मान्य झाल्यावर स्थगित करण्यात आले व प्रलंबीत मागण्यांसाठी मोर्चे बांधणी सुरु करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: