मुंबईकरांच्या गारेगार प्रवासाला ब्रेक, एसी लोकलच्या काचा फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ !

 

मुंबईमध्ये लोकल रेल्वे ‘लाईफलाईन’ समजली जाते. रोज या लोकलने लाखो लोकं प्रवास करतात. या प्रवाश्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनही विविध सुधारणा करत असतात. यापैकीच एक म्हणजे एसी लोकल. मुंबईकरांचा प्रवास गारेगार व्हावा यासाठी एसी लोकल सुरू करण्यात आल्या. मात्र गेल्या काही काळापासून या एसी लोकलमध्ये तोडफोडीच्या घटना वाढल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

मागच्या काही महिन्यांमध्ये एसी लोकलमध्ये तोडफोड आणि खिडक्यांच्या काचा फोडल्याच्या 18 घटना समोर आल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एसी लोकलमध्ये तोडफोडीच्या बहुतांश घटना या हार्बर मार्गावर घडल्या आहेत. चेंबूर आणि मानखुर्द या दोन स्टेशनदरम्यान रेल्वे रुळांच्या शेजारी झोपडपट्ट्या आहेत आणि या भागात अशा घटना अधिक घडल्या आहेत.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, एसी लोकलच्या दुरुस्तीचा खर्च जास्त आहे. प्रत्येक तुटलेली खिडकी बदलण्यासाठी आम्हाला १० हजार रुपये खर्च करावे लागतात. तसेच जे मनुष्यबळ इतर कामासाठी वापरले जाऊ शकते त्याचा वापर नुकसान झालेल्या एसी लोकलच्या दुरुस्तीसाठी करावा लागतो. त्यामुळे आगामी काळात आम्ही गस्त वाढवणार आहोत आणि जनजागृती मोहीमही हाती घेणार आहोत

Team Global News Marathi: