रोकड आणि सहकाऱयांच्या सुरक्षेसाठी तब्बल नऊ तास टपावर काढले !

चिपळूण शहरात संपूर्ण पाणी पभरलेले असताना एसटी महामंडळात पुराचे पाणी शिरल्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या सहकाऱयांचे तसेच सरकारी मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी तब्बल नऊ तास बसच्या टपावर बसून कर्तव्य पार पाडणारे चिपळूण आगार प्रमुख रणजित राजेशिर्पे यांचा आज परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांच्या हस्ते येथे विशेष सत्कार करण्यात आला.

राजेशिर्पे यांच्यासारखे तळमळीचे कर्मचारी महामंडळात आहेत म्हणूनच एसटीचे वैभव आजही टिकून आहे. या वैभवामुळेच एसटीची नाळ आजदेखील जनसामान्यांमध्ये रुजलेली आहे, असे काैतुकाद्गार यावेळी अॅड. परब यांनी काढले. तसेच राजेशिर्पे यांच्यासारख्या कर्मचाऱयांच्या विश्वासावर एसटीला आर्थिक गर्तेतून नक्कीच बाहेर काढू, असा विश्वासही अॅड. परब यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या आठवडय़ात कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण येथील एसटी स्थानक पुराच्या वेढय़ात पुरते बुडाले. यावेळी राजेशिर्पे यांनी प्रसंगावधान दाखवून आगारातील शक्य तितके सामान सुरक्षित स्थळी हलविण्याचा प्रयत्न केला. तसेच चालकांच्या मदतीने काही गाडय़ाही बाहेर काढल्या.

मात्र पाण्याची पातळी बघता भरपावसात लाखो रुपयांची रोख रक्कम घेऊन राजेशिर्पे हे आपल्या कर्मचाऱयांसोबत एसटीच्या टपावर बसले. सुमारे नऊ तास ते टपावर बसून होते. याची दखल घेत आज राजेशिर्पे यांचा सत्कार केला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी उपस्थित होते.

Team Global News Marathi: