खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने विशेष जनजागृती अभियान

मुंबई | कोविड काळात सामान्य जनतेला टास्क फोर्सचे डॉक्टर्स आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘इन्फोडोस’ या जनजागृती अभियानाला येत्या रविवारपासून सुरुवात होत आहे. खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात दर रविवारी सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जनतेला थेट तज्ज्ञांशी संवाद साधता येणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह होणाऱ्या या अभियानाचे सूत्रसंचालन अभिनेत्री – निवेदिका स्पृहा जोशी करणार आहे.

कोरोना संकटाच्या काळात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येणाऱ्या ‘इन्फोडोस’ या जनजागृती अभियानाच्या पहिल्या सत्रात, महाराष्ट्र टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक हे ‘कोरोनाची तिसरी लाट’ या विषयावर थेट संवाद साधणार आहेत. या पुढच्या सत्रात डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आशिष भूमकर, डॉ. बकुळ पारेख, डॉ. समीर दलवाई यांसह श्रीमती सुचित्रा सुर्वे आणि अन्य तज्ज्ञ मंडळी आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक अशा विविध विषयांवर जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. म्युकरमायकोसिस, तिसरी लाट, लहान मुलांमधील कोरोना, लहान मुलांची मानसिकता, डेल्टा प्लस, कोरोना लसीकरण या विषयांची चर्चा या अभियानात तज्ज्ञ डॉक्टर्स करणार आहेत.

महाराष्ट्राचे युवा नेतृत्व माननीय पर्यावरण मंत्री श्री आदित्यजी ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘इन्फोडोस’ या अनोख्या डिजिटल जनजागृती अभियानाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आले.

Team Global News Marathi: