सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही का? केतकीचा कोर्टाला सवाल

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेने सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही का, असा उलट सवाल ठाणे न्यायालयात रविवारी केला. शनिवारी रात्री ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि कृष्णा कोकणी यांच्या पथकाने तिला अटक केली होती.

रविवारी सुटीच्या न्यायालयात पोलिसांनी तिला हजर केले. यावेळी तिने आपली बाजू मांडण्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्याऐवजी स्वत:च आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. ती म्हणाली, सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नाही का? मी कोणी राजकीय नेता नाही की, माझ्या लिखाणाने लगेच कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मी सामान्य व्यक्ती आहे. जी पोस्ट केली ती एक प्रतिक्रिया होती. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक भाग असल्याचा दावाही तिने केला, तसेच ही पोस्ट स्वखुशीने केल्याचेही तिने यावेळी स्पष्ट केले.

काय म्हणाले पोलीस?

केतकीचा मोबाइल जप्त केला आहे. तिने सोशल मीडियावर शरद पवार यांच्याविरुद्ध केलेली वादग्रस्त पोस्ट कोणत्या डिव्हाइसद्वारे केली ते तपासण्यासाठी तिचा लॅपटॉपही जप्त करायचा आहे.वकील नितीन भावे यांनी लिहिलेल्या वादग्रस्त कवितेतील ओळी केतकीने शेअर केल्या आहेत. भावे नेमके कोण आहेत? की केतकीनेच असे पात्र निर्माण केले आहे, याचा शोध घ्यायचा आहे.

अशा वादग्रस्त पोस्टमुळे दोन समाजात तेढ आणि अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. तिला कोणती व्यक्ती किंवा संघटना अशा चिथावणीखोर पोस्टसाठी उद्युक्त किंवा प्रोत्साहित करीत आहे का? रबाळे पोलीस ठाण्यातही तिच्याविरुद्ध यापूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल आहे. तिच्याकडून हे सर्व जाणीवपूर्वक होत आहे. त्यामुळेच तिच्या चौकशीसाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी हवी.

Team Global News Marathi: