राज्यात आपली सत्ता असून, लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्री

 

मुंबई | बीकेसी, कलानगर येथील जाहीर सभेत भारतीय जनता पार्टीचा समाचार घेतल्यानंतर रविवारी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. पुढची २५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राज्यात असला पाहिजे. राज्यात आपली सत्ता आहे, लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे शाखेत बसा, प्रत्येकाच्या समस्या ऐकून त्या सोडवा, अशा सूचना ठाकरे यांनी केल्या.

बीकेसीतील सभेसाठी राज्यभरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि नेते शनिवारी मुंबईत होते. सर्व जिल्हाप्रमुखांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रविवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. यात शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची चर्चा झाली. यावेळी प्रत्येक गावात शिवसेना पोहोचविण्याच्या संकल्पनेवर काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.

स्थानिक स्वराज संस्थेसह राज्यातील प्रत्येक निवडणूक शिवसेना गांभीर्याने लढविणार आहे. त्यादृष्टीने तयारीला लागण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या. राज्यात आपली सत्ता असून, लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे शाखेत बसा, नागरिकांच्या समस्या ऐका. त्यांच्याशी संवाद साधा. समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करा. लोकांचा अपेक्षाभंग होता कामा नये तसेच भाजपसह विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला योग्य उत्तर दिले गेले पाहिजे. त्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी उपस्थित जिल्हा प्रमुखांना दिल्या.

Team Global News Marathi: