कुणीतरी महापालिकेत येतो आणि त्याच्या बंदोबस्तासाठी संबंध पोलीस स्टेशन दावणीला बांधलं जाते हे अत्यंत दुर्दैवी

 

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल पुणे महापालिकेला भेट दिली. याठिकाणीच काही दिवसांपूर्वी सोमय्या पायरीवर पडले होते. याचठिकाणी शुक्रवारी पुणे भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. एकीकडे हे सर्व सुरु असतांना दुसरीकडे जेव्हा सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या एका घटनेसंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या असता सर्व पोलीस किरीट सोमय्या यांच्या बंदोबस्तासाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला होता.

यासंदर्भात आणलेल्या अनुभवावर फेसबुक पोस्ट करत चाकणकरांनी टीका केली आहे. सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये जन्मदात्या पित्याने स्वतःच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर सर्व पोलीस किरीट सोमय्या यांच्या बंदोबस्तात आहेत , स्टाफ नाही असं उत्तर पोलिसांनी दिले. इतक्या निर्दयी आणि अमानुष घटनेची तक्रार तीन तास घेतली गेली नाही. मी फोन केल्यानंतर ती घेतली गेली,कुणीतरी महापालिकेत येतो आणि त्याच्या बंदोबस्तासाठी संबंध पोलीस स्टेशन दावणीला बांधलं जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे चाकणकर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेमध्ये जात असताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की होत असताना ते पायऱ्यांवरून घसरून पडले. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता तर दुसरीकडे हे आरोप फेटाळून लावण्यात आले होते.

Team Global News Marathi: