शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

 

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालासाठी काल पार पडलेल्या मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर पाचव्या फेरीअखेर सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला. पण शुभांगी पाटील यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवूनही तब्बल ४० हजार मते मिळवली. मात्र या पराभवाला खचून न जाता यापुढेही झाशीच्या राणीसारखे लढणार असल्याचे म्हणत शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कधीच साथ सोडणार नसल्याचे शुभांगी पाटील यांनी म्हटले आहे.

मात्र आता एक नवी माहिती पुढे आली आहे. पराभव झाला असला तरी आपण डगमगणार नाही. पक्षप्रमुखांची आणि शिवसेनेची साथ कधीच सोडणार नाही हे दाखवून देण्यासाठी त्या लवकरच उद्धव ठाकरेंची मुंबई येथे भेट घेणार आहे. याबाबत त्यांनी खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केली असून उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली आहे. सध्या राजधानी दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने संजय राऊत दिल्लीत आहेत. त्यामुळे आज शुभांगी पाटील यांची उद्धव ठाकरेंसोबत भेट होणार नाही.

मात्र उद्या शनिवार आणि परवा रविवार असल्याने संसदेच्या कामकाजाला सुटी असणार आहे. त्यामुळे संजय राऊत आज रात्री मुंबईत येण्याची शक्यता आहे. उद्या किंवा परवा शुभांगी पाटील आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. झालेल्या पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्यासारख्या सामान्य घरातील लेकीने ४० हजार मते मिळवणे ही एक मोठी बाब आहे. आतापर्यंत माझ्या कुटुंबातील एकही व्यक्ती सरपंचदेखील झालेली नाही. आणि अशा कुटुंबातील लेकीला पाच जिल्ह्यांतून ४० हजार मते मिळत असतील तर ते जनतेचे आभार आहेत. मी शिवसैनिकांचे आभार मानते, महाविकास आघाडीचे आभार मानते. पराभव झाला असला तरी यापुढेही झाशीच्या राणीसारखे लढायचे आहे.

 

Team Global News Marathi: