धक्कादायक: मुंबईत आजवरची सर्वात मोठी कोरोना रुग्णवाढ

मुंबई: मुंबईत करोना विषाणूने शिरकाव केल्यानंतर आजवरची सर्वोच्च रुग्णवाढ आज नोंदवली गेली आहे. गेल्या २४ तासांत मुंबई महापालिका क्षेत्रात तब्बल ५ हजार ६७ नवीन रुग्णांची भर पडली असून मुंबईकरांसाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा ठरली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नवीन करोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मंगळवारी मुंबईत ३ हजार ५१२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आज हा आकडा पाच हजारपार गेला असून मुंबईतील एका दिवसातील सर्वोच्च रुग्णसंख्या गेल्या २४ तासांत नोंदवली गेली आहे. मुंबईत आज एकूण ५ हजार ४४४ नवीन रुग्ण आढळले. त्यातील २२८ रुग्ण आयसीएमआरच्या यादीत दुबार आढळले तर १४९ रुग्ण मुंबई बाहेरचे आहेत. एकूण रुग्णांत निव्वळ मुंबईतील ५ हजार ६७ रुग्ण असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, मुंबईत करोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. आजच पालिकेकडून तब्बल ४७ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्णसंख्या वाढण्याचे ते एक प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत मुंबईत दररोज ५० हजार चाचण्यांचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याचेही पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: