धक्कादायक : कोल्हापूरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

धक्कादायक : कोल्हापूरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव (अण्णा ) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दुपारी 1 वाजेपर्यंत कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये झालेल्या विधान सभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकटावर निवडणूक जिंकले होते. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या उद्योग जगतात नावालौकिक मिळवला होता. पूर्वाश्रमीचे फुटबॉल खेळाडू, फुटबॉलखेळाचा पाठीराखा म्हणून त्यांची जिल्ह्याला ओळख होती.

मागच्या दीड वर्षात त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते ठणठणीत बरे झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

आमदार जाधव यांना पोटात इन्फेक्शन झाले होते. हैदराबाद मधील रुग्णालयात त्यांच्यावर सोमवारी मोठी शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, परंतु शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती. त्यातच आमदार चंद्रकांत जाधव यांची निधन झाले.

आपल्या दोन-अडीच वर्षाच्या आमदारकीच्या काळात कोल्हापूर शहराच्या तसेच उदयोजकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. साधी राहणी आणि लोकांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने मतदारसंघातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: