बौद्ध जनतेचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि महापरिनिर्वाण दिनीच कोरोनाचे नवे अवतार कसे उभे ठाकतात?

 

मुंबई | ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने यंदाही महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर कोणत्याही कार्यक्रमास परवानगी नाकारली आहे. त्याचप्रमाणे चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहनही सरकारने केलं आहे. मात्र, सरकारचं हे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी आव्हान दिले आहे.

आंबेडकरी समाज हा मृत्यूला कधीही भ्यायलेला नाही, असे ठणकावून सांगतानाच येत्या सोमवारी ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर जाणारच, अशी घोषणा आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय गेले हे पाहावे लागणार आहे.

आनंदराज आंबेडकर यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून सरकारचं हे आवाहन धुडकावून लावतानाच आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्याचं आवाहनही केलं आहे. तसेच आंबेडकरांच्या दर्शनासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे.

तसेच सर्व सण, उत्सव, राजकीय पक्षांचे सारे कार्यक्रम पुन्हा सुरू झाले असून ते सुरळीत पार पडत आहेत. मग बौद्ध जनतेचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि महापरिनिर्वाण दिनीच कोरोनाचे नवे अवतार कसे उभे ठाकतात? असा सवाल आनंदराज यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. राज्य सरकारने घरात बसून बाबासाहेबांना अभिवादन करावे असे फक्त आवाहन केले आहे. पण आंबेडकरी समाज हा बंदी- मज्जावाला कधीही जुमानत नाही, हे त्यांनी पक्के लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला.

Team Global News Marathi: