नगर : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या आणि आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर घालणारी आहे. तसेच नगर जिल्ह्यात सुद्धा कोरोनाने थैमान घातले आहे. आज लहान मुलांपर्यंत सर्वांनाच कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सोनई इथं एका तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशीच कोरोनामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
नगरमधील सोनई येथील राजस्थानी युवा मंचाचा कार्यकर्ता ओंकारलाल भळगट याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाची लागण झाल्यावर उपचारासाठी बेड न मिळाल्यामुळे त्याला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. असं वृत्त दैनिक सकाळने दिले आहे. धक्कदायक म्हणजे ज्या दिवशी त्याने आपला प्राण त्यागाला त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता.
त्याच्या मित्रांनी रात्री १२ वाजेनंतर वाढिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या. पण, सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचली. त्यामुळे मित्र परिवारात दुःखाचे वातावरण पसरले आहे. ज्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्याची नामुष्की मित्रांवर ओढावली. ओंकार हा राजस्थानी युवा मंचचा धडाडीचा कार्यकर्ता होता. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात त्याने अनेक गरजू लोकांना अन्न धान्याचे वाटप केले होते.