धक्कादायक: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 30 मृत्यू तर 1073 कोरोना बाधित

सोलापूर – शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक वाढतच चालला आहे. शहरात आज गुरुवारी दिवसभरात 356 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर ग्रामीण भागात 717 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 30 बाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी घडल्याने प्रशासन हादरले आहे.

सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा, एकाच दिवशी कोरोनाने तब्बल 14 जणांचा बळी घेतला आहे.शहरातील मृत्यूदर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.15 एप्रिल रोजी कोरोनाचे नवे 356 रुग्ण आढळले असून यामध्ये 206 पुरुष तर 150 स्त्रियांचा समावेश आहे.

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील परिस्थिती

आज दि.15 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 717 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.एकाच दिवशी 16 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.

आज गुरुवारी 15 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 717 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 420 पुरुष तर 297 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 453 आहे. यामध्ये 299 पुरुष तर 154 महिलांचा समावेश होतो. आज 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: