शिवसेनेच्या अडचणी वाढणार अपक्षासह छोटे घटकपक्षही आघाडी सरकारवर नाराज

 

राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांवर सहाव्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका मतालाही खूप किंमत आहे. त्यातच अपक्ष आणि छोटे पक्षांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी किंबहुना शिवसेनेसाठी राज्यसभेची वाट बिकट असल्याचं दिसून येते.

काही अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीने सत्तास्थापनेवेळी राज्यात १७० चा आकडा गाठला होता. मात्र आता वेगवेगळ्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीची कोंडी होताना पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानं सरकारला घेरलं आहे. तर हितेन ठाकूर यांनी राज्यसभा निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी माझी तीन मते गृहीत धरू नये, असं ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे बविआची ३ मते कुणालंच्या खात्यात जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

त्यातच अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी निधीवाटप आणि मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. समाजवादी पक्षानं अल्पसंख्याक विकास आणि मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दयावर सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आघाडीला मोठा झटका बसला आहे. समाजवादीचे अबू आझमी आणि रईस शेख असे २ आमदार आहेत.

Team Global News Marathi: