शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं भवितव्य निवडणूक आयोगाच्या हातात

 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत पक्ष आणि धनुष्यबाणावर दावा ठोकला होता. हा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी आला आहे. तसेच निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आवश्यक ते पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सध्या तरी शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं भवितव्य हे निवडणूक आयोगाच्या हातात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना विचारले असता त्यांनी एक सूचक विधान केले आहे.

आज नागपूर येथे शरद पवार यांना प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने पुरावे मागितलेले आहेत. याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, याबाबत मला काही सांगायचं कारण नाही. निवडणूक आयोग यासंबंधीचा निर्णय घेईल आणि निकाल देईल. शेवटी निवडणूक आयोगाने दिलेला निकाल कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य करावा लागेल, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला आवश्यक ते पुरावे सादर करण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. काल शिंदे गटाने शिवसेना आपलीच असल्याचे सिद्ध करण्यासाठी सुमारे ७ लाख शपथपत्रे निवडणूक आयोगासमोर सादर केली. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आजपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आता आज उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय कार्यकारिणीतील १८० जणांची शपथपत्रे सादर केली जाण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना अधिक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वाढवून मागण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: