शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघेंविरोधात गु्न्हा दाखल

 

ठाणे : शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे नव्याने नियुक्त करण्यात आलेले शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख
केदार दिघे यांच्याविरोधात मुंबईत बलात्कार पीडितेला धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, त्यांचा मित्र रोहित कपूर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली होती.

मुंबईतील ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका 23 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला ह्या खासगी कंपनीत क्लब अॅम्बेसिटर म्हणून काम करतात. मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांना क्लबच्या मेंबरशिपबाबत माहिती देण्याचे काम करतात. केदार दिघे यांच्या मित्राने 28 जुलै रोजी सेंट रेजीस हॉटेलमध्ये मेम्बरशीप घेण्याच्या बहाण्याने जेवणासाठी बोलावले होते. त्यानंतर क्लब मेम्बरशीपचे पैसे देण्यासाठी रुममध्ये थांबण्यास सांगितले. त्यानंतर रोहित कपूरने बलात्कार केला असल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे.

या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, त्यानंतर 31 जुलै रोजी पीडित महिलेने आपल्यावर बेतलेला प्रसंग तीन मित्रांना सांगितला. पीडितेने रोहित कपूरला व्हॉट्सअॅपवर याबाबत जाब विचारला. रोहित कपूरने पीडित महिलेला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले.

त्यानंतर एक ऑगस्ट रोजी पीडित महिलेने आपल्या मित्रांमार्फत आरोपीला विचारणा केली. मात्र, आरोपी रोहित कपूरने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आरोपी रोहित कपूर याने त्याचा मित्र केदार दिघे याच्या मध्यस्थीने पैसे घेऊन सदर घटनेबाबत कोणालाही वाच्यता न करण्यास सांगितले. मात्र, पीडितेने याला नकार दिला. या नकारानंतर केदार दिघे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप आहे. त्यानंतर, ,आता तक्रारदार महिलेने दिलेल्या जबावावरून ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात आरोपी रोहित कपूर व केदार दिघे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Team Global News Marathi: