शिवसेना आमदार रमेश लटके यांचे दुबईत निधन

 

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते.आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आमदार लटके यांच्या निधनाची माहिती मिळताच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही बातमी कळवली आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आमदार लटके यांचे पार्थिव मुंबईत आणन्याची तयारी सुरू असून लवकरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे.

आमदार रमेश लटके हे १९९७ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतरच्या सन २००२ आणि २००९ च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले.

Team Global News Marathi: