राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर ठाम, मोठ्या प्रमाणात तयारी सुरू

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे. “आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावंअसं भाजप खासदार म्हणतात. तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी हे देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध करत आहेत.

सर्व विरोधानंतरही राज ठाकरे अयोध्येला जाण्यावर ठाम असून मनसेच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांतून मनसे कार्यकर्ते अयोध्येला पाठवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी ११ गाड्यांचे बुकिंग करण्यात येत आहे. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते तेथे पोहोचणार आहेत. यासोबतच सर्व कार्यकर्ते आपापल्या परीने लखनौ आणि अयोध्येला येणार आहेत. उत्तर प्रदेश दौऱ्याच्या माध्यमातून राज ठाकरे महाराष्ट्रातील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक जोर देण्याचा प्रयत्न करतील.

५ जून रोजी राज ठाकरेंचा पहिला कार्यक्रम यूपीची राजधानी लखनऊमध्ये होणार आहे. राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, लाऊडस्पीकर आणि रस्त्यावरील धार्मिक मेळाव्यावर बंदी आणल्याबद्दल ते त्यांचे औपचारिक अभिनंदन करतील. येथून पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक थेट अयोध्येला पोहोचतील. तर अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासोबतच मनसे प्रमुखांचा हनुमानगढीमध्ये बजरंगबलीची पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण करण्याचाही कार्यक्रम आहे.

Team Global News Marathi: