शिवसेना आमदार राजन साळवी शिंदे गटात सामील होण्याची शक्यता ?

 

कोकणातूनदेखील उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते राजन सावळी हे शिंदे गटात जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. शिवसेनेचे कोकणात सध्या तीन आमदार आहेत. यात वैभव नाईक, भास्कर जाधव आणि राजन साळवी यांचा समावेश आहे. यापैकी एक आमदार राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जातंय.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील आमदारांच्या ते संपर्कात असून राज्याचे सध्या अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान, साळवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला येत्या काही तासात आणखी एक बंडाला सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पूर्णपणे उध्वस्त झालेल्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, असे म्हटले जातेय.

कोकणत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक असलेला लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजन साळवी. सध्या ते शिवसेनेचे उपनेतेही आहेत. कोकणात एकनाथ शिसंदेंसोबत गेलेल्या आमदारांमुळे शिवसेनेत मोठी अस्वस्थता आहे. आतापर्यंत राजन साळवींनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र तेदेखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विरोध केला आहे. तर आमदार राजन साळवी यांनी अधिक आक्रमकपणे या प्रकल्पाचं समर्थन केलं आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत कोकण दौऱ्यावर होते. त्यांनीदेखील रिफायनरीबाबत अनुकूल भूमिका घेतली. या प्रकल्पामुळे कोकणात रोजगार निर्मिती होईल, असं मत त्यांनी मांडलं होतं.

Team Global News Marathi: