शिवसेनेची बैठक संपली, मात्र पाच खासदारांची दांडी

 

शिवसेनेच्या खासदारांची आज बोलावण्यात आलेली बैठक संपली असून त्याला पाच खासदारांनी दांडी मारल्याचं स्पष्ट झालं आहे. हे पाच खासदार शिंदे गटामध्ये जाणार का याबद्दल आता चर्चा रंगू लागल्या असून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.

शिवसेना खासदारांची मातोश्रीवर तब्बल पाच तास बैठक सुरू होती, त्यामध्ये एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबद्दल कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.

आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेत खासदारही नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलवली होती. ही बैठक सुमारे पाच तास चालली होती. आता यातून काय मार्ग निघणार, खासदारांची नाराजी उद्धव ठाकरे दूर करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी भूमिका काही खासदारांनी घेतल्याची माहिती आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी यासंबंधी एक पत्र उद्धव ठाकरेंना दिलं होतं. त्यावरही आज चर्चा करण्यात आली असली तरी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याविषयी कोणताही ठोस निर्णय आज झाला नाही.

Team Global News Marathi: