शिवरायांचा अवमान प्रकरणी सर्व स्थरातून होणाऱ्या टीकेनंतर आता राज्यपाल कोश्यारींचं अमित शाहांना पत्र

 

– छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात करून विविध संघटना तसेच राजकीय पक्षांचा रोष अंगावर ओढवून घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानजनक विधान केल्याचा आरोप करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांनीही कोश्यारींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

अमित शाह यांना पाठवलेल्या पत्रामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणतात की, माझ्या भाषणातील एक छोटा भाग काढून काही लोकांनी भांडवल केलं. मी शिकत असताना विद्यार्थी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांना आदर्श मानत. हे सारे आदर्श आहेतच मात्र तरुण पिढी सध्याच्या काळातीलही काही आदर्श मानत असतेच. त्यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात, असं विधान मी केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही आदर्श समोर असू शकतो. पण याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणं, असा होत नाही. माझ्या भाषणामध्ये तुलना करणे हा विषयच नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे आदर्श आहेत, असे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहेत.

या पत्रात राज्यपाल पुढे म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मी केलेल्या विधानाचा काही लोकांकडून विपर्यास करण्यात आला. महापुरुषांच्या अवमानाची कल्पना मी स्वप्नातही करू शकत नाही. मी माझ्या भाषणामधून वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगितला. अशा व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अवमान केला असे म्हणता येणार नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: