शिवलिंग सापडलेली जागा संरक्षित करा, पण नमाजही रोखू नका!

 

नवी दिल्ली | वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराला खेटूनच असलेल्या ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मशिदीमध्ये शिवलिंग सापडलेली जागा संरक्षित करण्यात यावी, पण तेथील नमाजही चालू ठेवण्यात यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. नमाजसाठी फक्त 20 जणांना परवानगी देण्यात यावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवारी न्या. धनंजय चंद्रचूड व न्या.पी.एस. नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर अंजुमन मशीद कमिटीच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने सर्वेक्षणाला मनाई करता येणार नाही, असे स्पष्ट केले. जर मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडले असेल तर आपल्याला संतुलन राखावे लागेल. आम्ही जिल्हाधिकाऱयांना ती जागा संरक्षित करण्याचे आदेश देऊ, पण तेथील नमाज रोखता येणार नाही, असे खंडपीठाने सांगितले.

वाराणसी सत्र न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणासाठी आयुक्त म्हणून अजय मिश्रा यांना नेमले होते. त्यांच्या मदतीसाठी विशाल सिंह व अजय प्रतापसिंह या दोन सहायक आयुक्तांना देण्यात आले होते. मात्र, मिश्रा यांनी सर्वेक्षणात असहकार केला. त्यांनी स्वतःचा खासगी कॅमेरामन ठेवला. तो कॅमेरामन माध्यमांशी संवाद साधत होता. न्या. रविकुमार दिवाकर यांनी अजय मिश्रा यांची कोर्ट कमिशनरपदावरून तात्काळ उचलबांगडी केली. त्यांची जबाबदारी आता विशाल सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे.

Team Global News Marathi: