शिवाजी महाराजांनी ३५० किल्ले बांधले, पण कधी सत्यनारायण घातला नाही – श्रीमंत कोकाटे

शिवाजी महाराजांनी ३५० किल्ले बांधले, पण कधी सत्यनारायण घातला नाही – श्रीमंत कोकाटे

बार्शी – शिवाजी महाराजांनी बालवायतच तुकाराम महाराजांचे अभंग गायले. आपल्या कारकिर्दीत महाराजांनी तब्बल 350 किल्ले बांधले, पण एकाही किल्ल्याचा सत्यनारायण घातल्याची नोंद नाही. कारण, 350 वर्षांपूर्वी सत्यनारायणच नव्हता, असे म्हणत महापुरुषांनी नेहमीच वैज्ञानिक दृष्टीकोन जपला आणि समाजाला दिल्याचं मत शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले. तसेच, कुठल्याही ग्रंथात, वेदात, उपनिषदात सत्यनारायण पूजा नाही, असेही ते म्हणाले.

बार्शी तालुका कृषी पदवीधर विश्वस्त मंडळ आयोजित मनोरंजन आणि समाजप्रबोधन पर व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. शहरातील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात शनिवारी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम शेतकरी आणि दर्दी प्रेक्षकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

आपल्या साधु संतानीही आपणास वैज्ञानिक दृष्टीकोन दिला आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानाची शिकवण दिली, शब्दांची रत्ने जपायला, वाढवायला लावली, या संतांनी ज्ञानाची दिवाळी साजरी करायला सांगितली. तर, महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची दारे उघडली, बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून समाजात स्थान दिलं.

महापुरुषांनी आधुनिक आणि सर्वांगिण प्रगतीची शिकवण दिली. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा न बाळगण्याचा मूलमंत्र संत गाडगे बाबांनी दिल्याचंही कोकाटे यांनी म्हटलं. तर, याच कार्यक्रमात उपस्थितांना खळखळून हसवत, जगण्यासाठी जन्म आपुला असल्याचं प्रा. रविंद्र येवले यांनी म्हटलं. नवरा-बायकोर यांच्यातील हलके-फुलके विनोद सांगत तणामुक्त जीवन जगणे हेच दिर्घायुषी जगण्याचा मार्ग असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातील दिप प्रज्वलन करुन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. बी. वाय यादव यांनी भूषवले. तर, मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब साखरे, उपाध्यक्ष अशोक इनामदार, सचिव नितीन विश्वेकर, कार्याध्यक्ष दत्तबाळ अरनाळे, खजिनदार सिद्धांत गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सर्वांना कृषी विश्वस्त मंडळाचे मार्गदर्शक दिनकरराव जगदाळे, संतोष पाटील, दत्तात्रय शिंदे, दादारावा जाधवर प्रकाश शेळके, शहाजीराव पाटील, भारत कदम, सयाजीराव गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: