समृद्धी महामार्गावरील नागपूर- शिर्डी टप्प्याचे लवकरच उद्घाटन, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 

मुंबई | बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या प्रकल्पामुळे नागपूर ते मुंबईपर्यंतच्या अनेक जिल्ह्यांना लाभ होणार आहे. लवकरच या मार्गाच्या नागपूर- शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ कॉरिडोर मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सारीपुत नगर, आरे कॉलनी येथे झाला. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

शिंदे म्हणाले की, राज्य सरकार पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. ज्या राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम असते, तेथील नागरिक त्याचा वापर करतात, पर्यायाने रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनहिताच्या प्रत्येक प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या पाठीशी असून राज्य आणि केंद्र सरकार मिळून विविध महत्त्वाचे प्रकल्प गतीने पूर्ण करू, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाने सर्व घटकांचा परामर्श घेऊन मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाला परवानगी दिली असल्याने पर्यावरणाचा विचार करूनच मुंबईच्या हितासाठी जो निर्णय घेणे आवश्यक होते, ते निर्णय शासनाने घेतले. या मेट्रो लाईनमुळे मुंबईतील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे.

Team Global News Marathi: