शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना अटक

शिवाजी भोसले सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अनिल भोसले यांना तुरुंगात पाठवले आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार आहेत. भोसलेंसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ईडीच्या मुंबई झोनल ऑफिसने शिवाजी भोसले सहकारी बँकेतील फसवणुकीसंदर्भात कारवाई केली. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले हे शिवाजी भोसले सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांच्यासह बँकेचे दुसरे संचालक सूर्याजी जाधव, सीईओ तानाजी पडवळ, चीफ अकाऊंटंट शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. सध्या अनिल भोसले हे पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदार अनिल भोसलेंसह चौघांना २५ फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर या घोटाळ्याबाबत ईडीने गुन्हा दाखल केला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कोर्टातून भोसले यांचा ताबा घेण्यासाठी ऑर्डर काढली. बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खऱ्या दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण ३०० कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती असल्याचा दावा केला जात आहे.

Team Global News Marathi: