“उंदरांचा बंदोबस्त करणं शिवसेनेच्या वाघाला आता जमत नाही वाघ आता वृद्ध झाला आहे”

 

 

मुंबई | “महापालिका रुग्णालयात उंदराने डोळा कुरतडलेल्या रुग्णाचा मृत्यू होणे ही लाजिरवाणी घटना असून उंदरांचा बंदोबस्त करणेही शिवसेनेच्या वाघाला आता जमत नाही. शिवसेनेचा वाघ आता वृद्ध झाल्याचीच ही लक्षणे असून त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारावा हे उत्तम अशी खोचक टीका भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख शीतल गंभीर देसाई  यांनी केली आहे.

 

“तेलाच्या आशेने उंदराने पणतीतील जळती वात नेली तर आगी लागू शकतील असे शिवरायांचे आज्ञापत्र होते. पण निवडणुकीपुरते शिवरायांचे नाव घेणाऱ्या शिवसेनेला एवढी दूरदृष्टी नाही, हेच वारंवार दिसून येते आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शहर असलेल्या मुंबईचा कारभार असा चालत असेल तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईची मान खाली घालायला लावणारेच आहे” असे देसाई यांनी म्हटले आहे.

 

 

घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात हा प्रकार झाला होता. त्यानंतर अनेक महापालिका रुग्णालयात उंदीर-घुशी, कुत्री-मांजरे यांचा मुक्त संचार असल्याचे व्हिडियोदेखील प्रसिद्ध झाले होते. त्यासंदर्भात देसाई यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एवढी वर्षे उंदीर मारण्यावर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले तरी उंदरांमुळे होणारे नुकसान थांबवणे महापालिकेला जमत नाही. दुसरीकडे भटक्या कुत्र्यांची नसबंदी करूनही त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. आता भटक्या मांजरांचीही संख्या वाढत असल्याने त्यांचीही नसबंदी करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. त्याचीही अवस्था भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीप्रमाणेच होणार हे निश्चित आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

Team Global News Marathi: