नाशिक | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर शिवसेना आता जुळवून घेऊ लागली आहे. मात्र अनेक मुद्द्यावरून आघाडीमध्ये बिघाड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यशैलीमुळे जिल्ह्यातील शिवसेना आमदारांना निधी मिळण्यात विलंब होण्यासह कामांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधींनी खासदार संजय राऊत यांच्याकडे केली होती.
आता शिवसेना प्रतिनिधींवर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी शिवसेना स्टाइलने प्रतिउत्तर दिले आहे. पुढील पालकमंत्री शिवसेनेचाच होईल, यासाठी कामाला लागण्याचे आदेश राऊत यांनी देत थेट छगन भुजबळ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली. राज्यात सत्ता असूनही जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या प्रभावामुळे कामांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. या वेळी राऊत यांनी शिवसेनेकडे सत्ता नसतानाही आपण अनेकांना आपल्या स्टाइलने उत्तरे दिली आहेत. त्याप्रमाणेच पालकमंत्र्यांच्या कार्यशैलीला शिवसेना स्टाइलमध्ये उत्तर द्या, तसेच विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक आमदार निवडून आणले तर आपलाच पालकमंत्री बसवता येईल, अशी व्यवस्था करा, असेही ते म्हणाले.
तसेच राज्यात पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार आहे. महाविकास आघाडीची स्थापना करतानाच हे ठरले असल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केेले. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटला असून त्यांना शिवसेनेतील नवा प्रवाह माहिती नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे आता राऊत यांनी केलेल्या टीकेला भुजबळ काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.