शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांची हजेरी? राऊत म्हणतात की..

 

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या षण्मुखानंद हॉल येथे धडाडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा यंदा सुद्धा शिवतीर्थावर न होता माटुंग्याला हॉलमध्ये होणार आहे. या दसरा मेळाव्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार का? असा सवाल केला जात आहे. त्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे, असं सांगत या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याचंच राऊत यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलं. आमची मुलुख मैदानी तोफ उद्या धडाडणार आहे. कोरोना नियमांचं भान ठेवून हा मेळावा होईल. शिवसेनेची रॅली ऐतिहासिक असते. शिवाजी पार्कवर ही रॅली होते. लाखो लोक उपस्थित राहत असतात. पण कोरोनामुळे दोन वर्ष रॅली झाली नाही. यावेळी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा विचार होता. पण हजारो लोक जमून कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. त्यामुळे षण्मुखानंदमध्ये मेळावा घेण्याचं ठरलं आहे.

तसेच या मेळाव्यात उद्धव ठाकरे रोखठोक मते मांडतील. देशाच्या, राज्याच्या राजकीय घडामोडींवर ते भाष्य करतील, असं राऊत म्हणाले. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार का? असा सवाल करताच हा मेळावा शिवसेनेचा असतो. तो शिवसेनेचा दसरा मेळावा आहे, असं त्यांनी सांगितलं.

Team Global News Marathi: