‘शिवसेनेने गीता पठणाऐवजी नमाज पठणाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली’; दानवेंचा निशाणा

‘शिवसेनेने गीता पठणाऐवजी नमाज पठणाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली’; दानवेंचा निशाणा

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘अमर अकबर अँथोनी’ या हिंदी चित्रपटातील अकबर असा करत निशाणा साधला आहे.आता शिवसेनेने गीता पठण करण्याऐवजी नमाज पठणाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री दानवे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ते बुलडाण्यात भाजपच्या आढावा बैठकीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी कोळशाच्या तुटवड्यावरूनही राज्य सरकारवर निशाणा साधला.

 

हायलाइट्स:

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेवर निशाणा.

शिवसेनेचा अमर अकबर अँथोनी चित्रपटातील ‘अकबर’ असा केला उल्लेख.

गीता पठणाऐवजी आता शिवसेनेने नमाज पठणाचे वर्ग सुरू केले आहेत- रावसाहेब दानवे.

 

हे अमर-अकबर-अँथनीचं सरकार, शिवसेना यामध्ये अकबर | रावसाहेब दानवे

 

 

बुलडाणा: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आज महाविकास आघाडी सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले असून हे ‘अमर अकबर अँथोनी’चे सरकार आहे. यात शिवसेना (Shiv Sena) कधीच अकबर झालेली असून आता शिवसेनेने गीता पठण करण्याऐवजी नमाज पठणाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री दानवे यांनी केली आहे. ते बुलडाण्यात बोलत होते.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे बुलढाणा लोकसभा मतदार संघात भाजपाच्या आढावा बैठकीसाठी आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. त्याच्या सोबत यावेळी आमदार आकाश फुंडकर,आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार चैनसुख संचेती, भाजप प्रवक्ते विनोद वाघ, भाजपचे महामंत्री योगेंद्र गोडे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारने राज्यात कोळशाचे नियोजन योग्य पद्धतीने केले नाही. याच कारणामुळे राज्यात अभूतपूर्व लोडशेडिंग सुरू झाले आहे. यामुळे हे सरकारच अपयशी असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला.

 

संपूर्ण राज्याला वीज पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची नसून ती राज्य सरकारची आहे. राज्य सरकारचा कारभार नियोजन शून्य आहे. अशा या कारभारामुळेच राज्य आज वीज टंचाईला तोंड देत आहे, असे आरोप करत रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. केंद्र सरकार जर कोळसा देत नसेल तर राज्याने परदेशातून कोळसा आणायला हवा, असेही रावसाहेब दानवे पुढे म्हणाले.

शेतकरी आणि उद्योजकांची गरज काय आहे हे लक्षात घेत राज्य सरकारने कोळसाचा साठा करणे आवश्यक होते. मात्र या सरकारने ते केले नाही, अशी टीकाही दानवे यांनी राज्य सरकारवर केली.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: