शिवसेना पक्षाच्या उत्पन्नात घट; २०१९-२० वर्षात तब्बल १६ टक्क्यांची घसरण !

 

मुंबई | राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाच्या उत्पन्नात घाट झाल्याची माहिती समोर आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेत आहेत. त्यात शिवसेना देखील आहे. मात्र सत्तेत असतानाही शिवसेनेचं उत्पन्न १५.५७ टक्क्यांनी घटलं आहे.

सध्या शिवसेनेचे उत्पन्न १५.५७ टक्क्यांनी घटून ते २०१९-२०२० या वर्षात १११.४० कोटी रुपयांवर आलं आहे. ज्यावर्षी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेचं हे पक्षाचं उत्पन्न आहे. २८ नोव्हेंबर २०१९ ला उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी म्हणजेच २०१८- २०१९ यावर्षात शिवसेनेचं उत्पन्न १३५.५० कोटी रुपये होते. स्वतः शिवसेनेनं एप्रिल २०२१ च्या निवडणूक आयोगानं दिलेल्या आपल्या वार्षिक लेखा अहवालात ही माहिती दिली.

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्त्व शिवसेना पक्ष करत आहे. ३१ मार्च २०२० संपलेल्या आर्थिक वर्षात शिवसेनेचं उत्पन्न १११.४० कोटी रुपये असल्याचं म्हटलं आहे. या उत्पन्नात शुल्क आणि नोंदणीतून २५.३९ लाख रुपये, अनुदान आणि देणग्या तसंच वर्गणीच्या माध्यमातून १०५.६५ कोटी रुपये आणि अन्य माध्यमांतून ५.५० कोटी रुपये मिळाले होते.

तसंच ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात शिवसेना पक्षाला शुल्क आणि नोंदणीतून ९०.४२ लाख रुपये, अनुदान, देणग्या आणि वर्गणीच्या माध्यमातून १३०.९६ कोटी रुपये आणि अन्य माध्यमांतून ३.६४ कोटी रुपये मिळाले होते. दोन वर्षात शिवसेनेला १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या या इलेक्टोरल बाँडमधून मिळाल्या आहेत.

Team Global News Marathi: