शिवसेना पक्षाचे १२ आमदार भाजपच्या संपर्कात, भाजपच्या या माजी मंत्र्यांचे विधान

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार लवकरात लवकर कोसळेल आणि नव्याने भाजपचे सरकार स्थापन होईल असे विधान अनेकदा भारतीय जनता पक्षाचे नेते करताना दिसून आले आहेत. त्यातच आता भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्र्याने मोठे विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

 

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी हे विधान केले आहे. शिवसेनेचे १२ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, शिवसेनेकडून तो तातडीने फेटाळण्यात आला आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाआघाडी राज्यात सत्तेवर आहे. मात्र, ते सरकार सत्तेवरून जाईल, अशा स्वरूपाची वक्‍तव्ये भाजपचे नेते वारंवार करतात. आता लोणीकर यांनी राज्यात लवकरच सत्ताबदल होण्याची शक्‍यता वर्तवली.

देगलूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत लोणीकर बोलत होते. त्यांच्या भाकितामुळे पुन्हा चर्चेला तोंड फुटणार आहे. तर दुसरीकडे मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिवसेना प्रवक्‍त्या मनीषा कायंदे यांनी लोणीकरांचा दावा सपशेल फेटाळला. त्या दाव्यात कुठलेही तथ्य नाही. राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याचे दिवास्वप्न भाजप पाहत आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकांत भाजपच्या जागा कमी होऊनही ते घडत आहे, असा शाब्दिक टोला त्यांनी लगावला.

Team Global News Marathi: