शिवसेना कोणाची खासगी मालमत्ता नाही, ती शिवसैनिकांचीच; जैस्वालांचा ठाकरेंना इशारा

शिवसेना कोणाची खासगी मालमत्ता नाही, ती शिवसैनिकांचीच; जैस्वालांचा ठाकरेंना इशारा

मुंबई :- शिवसेना (Shiv Sena) ही कोणाची खासगी मालमत्ता नाही, असा थेट इशारा रामटेकचे शिवसेनाप्रणित आमदार आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) कार्यपद्धतीवर नाराजी असल्याने शिवसेनेतील केवळ ४० आमदार बाहेर पडले आहे. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील होण्यासाठी शिवसेनेचे आणखी अनेक नेते उत्सुक आहेत. विदर्भाचाच विचार केला तर खासदारांसह, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता गांभीर्याने विचार करावा, असा इशारा आशिष जैस्वाल यांनी दिला आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर तोंडसुख घेताना आशिष जैस्वाल म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारला महाविकास आघाडीच्या १७० आमदार असल्याचा खूपच गर्व होता. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी उठाव केला. महाविकास आघाडी सरकारला त्यांची खरी जागा दाखवली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाळ्यात अडकलेल्या शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला.

 

आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे सरकार महाराष्ट्राच्या सेवेत आले आहे. नव्या सरकारमुळे विदर्भावरील अन्याय दूर होईल अशी माझी खात्री आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यात गेल्या वेळेस सेनेला मंत्रिपद मिळाले नव्हते, यावेळी नवे सरकार विदर्भाला प्रतिनिधीत्व देणार अशी अपेक्षा आशिष जैस्वाल यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीने दिलेल्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त करताना आमदार आशिष जैस्वाल म्हणाले, पक्ष हा कार्यकर्त्यांचा असतो. महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार, खासदार, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. हे सत्य आहे. शिंदे यांच्या नेतृत्वात हे एकत्र येत आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही वारंवार तक्रारी केल्या. विकास कामांसाठी निधी मिळत नव्हता. मंत्री टक्केवारी मागत असल्याच्या अनेकदा तक्रारी केल्या. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही सर्वानी मिळून शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तावडीतून मुक्त केले. आणि हिंदुत्वाला धरून जनतेने दिलेल्या कौलानुसार सेना-भाजपचे सरकार आम्ही आणले, असेही आशिष जैस्वाल म्हणाले.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: