ठाणे, नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार

ठाणे, नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार

मुंबई : शिवसेनेला एका मागून एक धक्के बसत आहेत. ठाण्यातील शिवसेनेचे ६६ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतदेखील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीनंतर शिवसेनेचे ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात जाणार आहेत.

मुंबईत शिवसेनेला धक्के बसत असतानाच ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता ठाण्यातील शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. म्हस्के यांच्यासह ६६ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. ठाण्यात शिवसेनेचे एकूण ६७ नगरसेवक आहेत. त्यापैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसेनेसाठी हा फार मोठा धक्का आहे.

यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, किशोर पाटकर असे जेष्ठ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार आहेत. यामध्ये ऐरोली मतदारसंघातील जवळपास ९० टक्के नगरसेवकांचा समावेश आहे.

नवी मुंबईतील ५० पैकी ३२ नगरसेवक संपर्कात
नवी मुंबईत शिवसेनेचे ५० नगरसेवक आहेत. त्यामधील ३० ते ३२ जण एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार आहेत. आगामी काळात उर्वरित नगरसेवकांनादेखील गळाला लावण्याचे काम शिंदे गटाकडून होणार आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शिवसेनेसाठी हा आणखी एक मोठा धक्का आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: