राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

 

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातलाय. आता याचं पावसानं मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडही आपल्या कवेत घेतलाय. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल. त्यानंतर बीचवर जाऊ नये अशी सूचना महापालिकेनं दिली आहे. अलर्टच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी लाईफगार्ड, स्पीड बोटस्, अग्नशमन दलाची संरक्षक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी देखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत होता. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Team Global News Marathi: