खासदार राहुल शेवा यांच्यावर एका महिलेचे शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. आता या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला आहे. शेवाळे यांच्यावर झालेल्या आरोपावरुन राष्ट्रवादीच्या महिला पदिधाकाऱ्यांमध्ये चांगलेच खटके उडत आहे. राहुल शेवाळे प्रकरणात पीडितेचा चेहरा उघड केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हा इशारा दिला आहे.
खासदार राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणा-या पीडित महिलेचा चेहरा फेसबुक लाईव्हद्वारे उघड केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर राज्य महिला आयोग कारवाई करणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्या आहेत. दरम्यान, मी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. त्यामुळं महिला आयोग कारवाई करू शकत नाही, असं प्रत्युत्तर रुपाली पाटलांनी दिले आहे.
खासदार राहुल शेवाळे आरोप प्रकरणातील पीडितेला संरक्षण देण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. महिला आयोगाने पोलीस महासंचालकांना वारंवार पत्र पाठवून देखील संबंधित पीडितेची साधी तक्रार देखील पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून घेतली जात नाही ही बाब चिंताजनक असल्याचा चाकणकर यांनी म्हटल आहे. ती महिला मुंबईत येईल आणि गुन्हा दाखल करेल, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला आहे. राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या जीवाला धोका असल्याचा दावा रुपाली पाटील यांनी केला होता. तसेच त्या महिलेला मुख्यमंत्र्यांनी संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली होती.