“शिंदेसाहेब, फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात”

 

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन होऊन एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. एकीकडे शिगेला पोहोचलेल्या सत्तासंघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयात गेला असून, दुसरीकडे नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

तर दुसरीकडे  तारीख पे तारीख सुरू असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी, एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या नादाला लागून राज्य अधोगतीकडे नेत असल्याची टीका केली आहे.

नव्या शिंदे-भाजप सरकार सत्तेत येऊन महिना लोटला आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडत नाही. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आक्रमक होताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांमध्ये एकमत होत नसल्यानेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा दावा करण्यात येत आहे. उलट येत्या दोन ते तीन दिवसांत निश्चितपणे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा कयास बांधला जात आहे. यातच अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत शिंदे गटाला टोला लगावला आहे.

शिंदे सरकारला ३५ दिवस पूर्ण. राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार. या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली आहे. जे चालवलय ते बरे नाही शिंदे साहेब. फडणवीसांच्या नादाला लागुन आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात, अशी टीका करणारे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे.

Team Global News Marathi: