आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, रोज काहीतरी बोलून स्वतःचं हसं करुन घेणं योग्य नाही”

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दावोस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाला. तसेच मुख्यमंत्र्यांनी दावोस दौऱ्यात नेमके काय केले?याचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना आणि टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत. आदित्य ठाकरे यांना वयामुळे अनुभव नाही, हे आम्ही समजू शकतो. म्हणून रोज काही तरी बोलायचे आणि स्वत:चे हसे करून घ्यायचे, हे योग्य नाही. आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे, खात्री करून घ्यावी, असा सल्लाही दीपक केसरकर यांनी दिला.

जगभरातील लोक दावोसमध्ये चार्टर्ड विमानानेच येतात. चार्टर्ड विमानाने प्रवास केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला, असे होत नाही. यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाने प्रवास केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत. दावोस दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कमर्शियल विमानाचे तिकीट बूक करण्यात आले होते. दावोसमध्ये ३७ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी अनुपस्थित राहणे, हे योग्य नव्हते. हा पंतप्रधानांचा अपमान ठरल असता, असे दीपक केसरकर म्हणाले

Team Global News Marathi: